एसटी बसमध्ये चढताना दागिने चोरणारी महिला अटकेत


सोलापूर येथील बस स्थानकात प्रवाशांची चोरी करणाऱ्या एका महिला चोरट्याला फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने अटक करुन तिच्याकडून १२ तोळे सोने जप्त केले आहे. आयेशा युसूफ शेख (वय ३३, रा. रेहमतबी झोपडपट्टी, सध्या रा. समाधाननगर, अक्कलकोट रस्ता) असे अटक करण्यात आलेल्या संशयित महिलेचे नाव आहे.

२१ ऑक्टोबर रोजी अश्विनी गोपाळ पाटील (वय ३४, रा. गणेशनगर, हैदराबाद रस्ता) या दिवाळीनिमित्त माहेरी जात होत्या. एसटी स्टॅण्डवर बसमध्ये चढताना अज्ञात महिलेने त्यांचे सोन्याचे दागिने लंपास केले होते.. याबाबत त्यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर
पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. एक महिला चोरीचे दागिने विकण्याकरिता लक्ष्मी मार्केट परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्या संशयित महिलेला ताब्यात घेतले. तिची चौकशी केल्यानंतर तिने गुन्हा कबूल केला.

फक्त एसटी बसमध्ये गर्दीचा फायदा घेत चोरी करत असल्याची माहिती तिने पोलिसांना दिली. पोलिसांनी तिच्याकडून दोन गुन्ह्यांतील एकूण साडेबारा तोळ्यांचे पाच लाख २९ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सध्या ती न्यायालयीन कोठडीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील, विकास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे, पोलीस अंमलदार दीपक डोके, आयाज बागलकोटे, धनंजय बाबर, कृष्णा बडुरे आदींनी केली.