वळसंग पोलिसांची कामगिरी : २०२ जणांना अटक वॉरंट
सोलापूर : - वळसंग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले यांनी प्रलंबित गुन्ह्यांचा निपटारा करण्याचे काम हाती घेऊन ते तडीस नेण्याची मोहीम सुरू केली आहे. यामुळे सराईत गुन्हेगार पोलिसांसमोर हजर होऊन शरण जात आ- हेत. न्यायालयात हजर न होता पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक वॉरंट बजावून त्यांना धडा शिकवण्यात येत आहे. या मोहिमेची कुणकुण लागताच सराईत गुन्हेगार पोलिसांसमोर हजर होऊन शरण जात आहेत.
बहुतांश गुन्हेगार कोर्टात हजर होऊन जामिनासाठी प्रयत्न करत आहेत. अनिल सनगल्ले यांनी राबविलेल्या प्रलंबित गुन्हे निपटारा कामगिरीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेमुळे लवकरच वळसंग पोलीस ठाणे व त्या अंतर्गत येणाऱ्या गोदुताई परुळेकर विडी घरकुल येथील पोलीस चौकी अंतर्गत असलेल्या गुन्ह्यांची निर्गती होण्यास मदत होणार आहे.
सोलापूर-अक्कलकोट महामार्ग, तीन सिमेंट कारखाने, साखर कारखाने, अति संवेदनशील कुंभारी येथील गोधुताई परुळेकर विडी घरकुल, कुंभारी, दर्गनहळ्ळी, वळसंग या संवेदनशील ठिकाणांसह ३५ गावांच्या सुरक्षेचा डोलारा वळसंग पोलीस ठाणे सांभाळत आहे. सोलापूर- हैदराबाद आणि अक्कलकोट- सोलापूर दोन राष्ट्रीय महामार्गामुळे अपघाताचे प्रमाणही अधिक आहेत. अपघातग्रस्तांना मदतकरण्याबरोबरच विडी घरकुल येथील किरकोळ घटनेला लागणारा वेळ, यामुळे पोलिसांचा ताण वाढत आहे. या सगळ्या जबाबदारी पेलत आणि रोज घडणाऱ्या गुन्ह्यांचा छडा लावत गुन्हे निर्गतीची मोहीम जोरात सुरू आहे. आतापर्यंत एका महिन्यात तपास करून ५० खटले न्यायालय दाखल केले आहेत. मृत्यू झालेल्या आठ घटनांचे तपास पूर्ण करण्यात अनिल सनगल्ले यांच्या पथकाला यश आले आहे. प्रलंबित २१६ अटक वॉरंटपैकी २०२ गुन्हेगारांना अटक वॉरंट बजावण्यात आली आहेत. त्यातील अनेकांना अटकही करण्यात आली आहे. एक महिन्याच्या कालावधीत नऊ जुगार अड्डयावर धाडी टाकून १० हजार ५७४, तर १८ ठिकाणी सुरू असलेल्या अवैध दारू धंद्यावर धाडी टाकून १० हजार ९६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे...

